Tuesday, November 27, 2012

दरवळणारे सुगंध

गरम-गरम, आलं घातलेला, वाफाळलेला चहा...एका झटक्यात सकाळ सुवासिक बनून जाते. अशा चहाचा गंध घेऊन ज्याला चहा प्यायचा मोह होत नसेल, तो माणूसच काय!

प्रत्येक सकाळ ही एक नवीन सुगंध घेऊन येते. कधी पावसाची चाहूल, कधी थंडीची ऊब, तर कधी उन्हाचा तडाखा. प्रत्येक दिवसाचा जसा रंग न्यारा, तसाच सुगंधही. दिवस कसा असेल हे प्रत्येक सकाळच्या सुवासावरून कळते.

चैत्र महिन्यात वसंताची चाहूल लागते. सकाळी उठून एक उल्हासित सुगंध दरवळत असतो. जणू सांगत असतो की झाडांना नवी पालवी फुटणार आहे. नवीन आशा, नवीन स्वप्ने, नवीन आकांक्षा. सारं काही नवीन. निरभ्र आभाळाखाली एक दीर्घ श्वास घेऊन सभोवतालचा आनंद आपल्यात सामावून घ्यावा आणि मगच दिवसाची सुरवात करावी.

जशी उन्हाची तीव्रता वाढते, तसाच सुगंधही बदलतो. एक तीक्ष्ण असा सुवास येणाऱ्या तप्त दिवसाची चाहूल देऊन जातो. उष्णता त्या एका सुगंधात लपली असते. हा सुवास जेव्हढा उष्ण, तेव्हढाच कोरडा. सूर्य आता तापला आहे आणि आता कोणाची खैर नाही असा प्रेमळ इशारा असतो.

पण याच दिवसात एक अजून अलौकिक सुगंध घराघरांत दरवळत असतो. एका टोकरी मध्ये बंद करून ठेवलेल्या त्या फळांचा सुवास घरा-दारात भरून राहिला असतो. उगाच नाही त्याला फळांचा राजा म्हणत. खरा तर आंब्याच्या सीझनला असा एक दंडकच केला पाहिजे की  सर्वांनी उठल्यावर प्रथम आम्रसुगंध घ्यावा, आम्र-फळास वंदन करावे, आणि मगच दिनचर्येस सुरवात करावी. तसे न केल्यास आजन्म आंब्यांना मुकावे ही शिक्षा.

जसा आंब्याचा सीझन संपत येतो तसा येणाऱ्या वर्ष ऋतूची चाहूल देऊन जातो. "आज भयंकर उकडतंय, नाही?" "पाऊस येणार वाटतं!" "पाऊस येउदे एकदाचा, खूप झाला उन्हाळा!" असल्या उद्गारानीच आपण पावसाळ्यास सज्ज होतो.

सकाळपासूनच हवेत आर्द्रता जाणवत असते. मेघगर्जनेसह वळवाचा पाऊस हजेरी नक्की लावणार असे वाटत राहते. सकाळच्या दमट सुगंधाने शुष्क झालेल्या मनाने उभारी घेतलेली असते. पण नेहेमीसारखाच पाऊस हुलकावणी देऊन जातो.


कधीतरी रात्री धुमाकूळ पाऊस पडून जातो. सकाळचा पहिला श्वास तुम्हाला रात्रीची कथा सांगून जातो. वातावरणात, वळवाच्या पाऊसाने केलेला पहिला स्पर्श अजूनही तरळत असतो सकाळच्या धुंध वासात.


वर्षा ऋतूच्या विलक्षण सौंदर्यात धरती न्हाऊन गेलेली असते. दररोज सकाळी अधिकाधिक बहरत जाणारी झाडं, फुलं, पानं, सगळंच  विलोभनीय असतं. याच दिवसात पारिजातकाचा वेड लावणारा सुगंध तुमची सकाळ मोहवतो. रातोरात खुलणारी रातराणी, जाई-जुई, सायली, आणि मोगरा, या फुलांनी तर सर्व आसमंत भरून जातो.


सकाळ-सकाळी फुलांनी लगडलेल्या पारिजातकाच्या झाडाखालून कधी गेला आहात? किंवा, झाडाखाली कोणी हिऱ्यांचा सडा टाकला आहे, असे भासवणाऱ्या फुलांना वेचायला कधी गेला आहात का? फुलांचा सुगंध तर अप्रतिम असतोच. पण झाडाखाली पडलेली फुले वेचतावेचता, जेव्हा झाडावरून पडणारी फुले कधी आपल्या पायाशी, तर कधी आपसूक परडीत येऊन पडतात, तेव्हा काय अप्रूप वाटते! आणि नुसतीच फुले नाहीत, तर त्याबरोबर पानांवरून गळणारे टपोरे थेंब, कधी हातावर, तर कधी पाठीवर पडतात, आणि अंगावरून एक सुर्रकन शिरशिरी जाते.


पारिजातकाची फुले हातात घेऊन बघा, आणि त्यांचा सुगंध मनात साठवा. ओंजळ रिकामी केलीत, तरी सुगंध तसाच टवटवीत आणि मोहून टाकणारा येईल तुमच्या हातांना.


पावसाच्या सुरवातीस अजून एका प्रकारच्या वासाची खासियत आहे. सगळ्यांनाच हा वास आवडेल असे काही नाही. पण आहे मात्र या सीझनचे खास वैशिष्ट्य! छत्री आणि रेनकोट यांचे वास. वर्षभराने काढलेले छत्री आणि रेनकोट यांना नेहेमीच एक वेगळा, खास पावसाळी वास येतो. या वासाने मला कायम बेडकाची आठवण होते.


या दिवसात आपल्याला अजून एका वासाची सवय होते, किंबहुना सवय करून घ्यावी लागते. ओल्या, दमट कपड्यांचे वास. आपण कितीही प्रयत्न केला, पूर्ण झाकणारा रेनकोट-टोपी हे सोपस्कार केले, तरीही कपडे ओले होतातच, आणि लवकर वाळत पण नाहीत. आज पाउस येणार नाही, या विश्वासाने आपण बाहेर पडलो की पाउस हमखास आपल्याला फसवणार. मग ओलं होवून घरी येण्याशिवाय गत्यंतर नसतो. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना तुमचा कोरडेपणा रुचत नाही. ते पावसाची कमी पुरी करतात. एकुणात कपडे ओले राहून दमट वासाची सवय होते.


असे भिजून आल्यावर कांदाभजीचा वास खुणावतो, आणि "खाण्यासाठी जगावे" ते पटते. गरम-गरम भाजीचा वास का एकदा नाकात गेला की मग ना पावसाचे भान, ना ओल्या कपड्यांचे.


श्रावण येतो आणि खाण्याची रेलचेल सुरु होते. नुसतीच सुवासित फुले नव्हे, तर खरपूस, खमंग, जीभेचे चोचले पुरवणारे, एक-से-एक, पदार्थ आपल्या खाद्य संस्कृतीत आहेत.


दर श्रावणी शुक्रवारी एक वेगळा पदार्थ. जीवती देवीच्या व्रतामुळे दर शुक्रवारी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. एका शुक्रवारी पुरणपोळीचा घमघमाट असतो. खीर, घावन, आरत्या, चवाचे कानवले या सगळ्यांचा एका पाठोपाठ क्रमांक लागतो. दर शुक्रवारी कामावरून घरी शिरल्या-शिरल्या असा काही मस्त वास येतो की ते वाण-बीण बाजूला राहिलं, लागलीच पानावर बसावे.


हे झालं शुक्रवारचे. पण श्रावणात तर प्रत्येक दिवसच साजरा करण्यासारखा असतो. घराबाहेर पावसाने चिंब झालेल्या मातीचा सुवास, तर घरात वेगवेगळ्या रुचकर पदार्थांचा. नागपंचमीला फळे, शिळसप्तमीला सांजा, पौर्णिमेला नारळी भात असले स्वादिष्ठ  पदार्थ. 


नागपंचमी ला मेंदीचा धुंध सुगंध. ओल्या मेंदीचा, हातावर सुकलेल्या मेंदीचा, आणि रंगलेल्या मेंदीचा सुगंध वेगवेगळा येतो. जितकी मेंदी रंगते तितकी मज्जा वाटते. पण जशी फिकी पडते तसं वाईट वाटतं. नक्षीदार मेंदीने सजलेले हात जेव्हा पूर्ववत बेरंग होतात, तेव्हा वाईट वाटते. पण आश्चर्य म्हणजे त्या पांढऱ्या हातांनापण अजून एक अती सूक्ष्म सुवास येत असतो!

खमंग, सुरमट, साजुक तुपातला नारळी भात घेऊन नारळी पौर्णिमा येते. पाठोपाठ येते जन्माष्टमी. दूध-पोहे आणि दही-पोहे इतका सोप्पा आणि टेस्टी नैवेद्य घेऊन!


मग वाट पाहतो आपण गणपतीच्या दिवसांची. धूप-दीप, अगरबत्ती, फळे, केवड्याची पाने, कमळाची फुले, लाल जास्वंदीची फुले, दुर्वा, पेढे, खोबरं-साखर, साखरफुटाणे, खारीक-खोबरं, सर्व गोष्टींचे मिसळण होवून एक अनामिक मंगलमय वातावरण तयार होते, बेहद्द आल्हादायक!

गौऱ्या घरी आल्या की आनंदाला उधाण येते. चिवडा-लाडू, करंज्या, अनारसे बनवले जातात आणि स्वागताची जय्यत तयारी होते. खीर-घावन, वरण-पुरण, वालाचे बिरडे, बटाट्याची भाजी, पुऱ्या, श्रीखंड, लोणचे, पापड, अगदी लिंबूच्या फोडीचा वास देखील पोटातल्या अग्नीला आहुती वाहतो.

विसर्जनाच्या दिवशी घाटावर जाऊन नुसते उभे राहिले तरी भरपूर फायदा होतो. घराघरातल्या विसर्जित होणाऱ्या गणरायांचे दर्शन होते. शेवटच्या कर्पुरारतीच्या सुवासाने आसमंत भरून गेलेले असते. आरत्या आणि "पुढल्या वर्षी लवकर या" या घोषात उत्साह शिगेला पोचतो. या सगळ्या उत्सवाचा आनंद तर घेता येतोच, पण त्या शिवाय अजून एक मोठा फायदा म्हणजे वाटल्या डाळीचा प्रसाद मिळतो. त्याकरिता तुम्ही घरातलेच असायला पाहिजेत असा काही नाही हां! येण्या-जाणाऱ्या सगळ्यांना मिळतो हा प्रसाद. कधी सुकी डाळ तर कधी ओली. पण त्याशिवाय गणरायाला निरोप कसा द्यायचा?

गणेश विसर्जना नंतरचे दोन आठवडे म्हणजे आपल्या पूर्वजांना प्रसाद देण्यासाठीचे दिवस. आपापल्या पितरांना श्रद्धांजली वाहिली जाते ती घरोघरी. हा काही सार्वजनिक सण नाही. तरीदेखील जेव्हा घरी "तीथ" असते, तेव्हा गोड वडे, तिखट वडे - खीर, आमसुलाची चटणी. गवार-भोपळ्याची, कारल्याची, भेंडीची भाजी, कढी हे सर्व पदार्थ केले जातात. मला तिखट वडा - खीर हे combination कमालीचे आवडते, अगदी कायम पण खाऊ शकते.

पितृपंधरवडा संपतो न संपतो तोच नवरात्र सुरु. नवरात्र म्हटला की मला आठवतं आमच्या घरी बाबा धूप लावतात दररोज संध्याकाळी तेच. आमच्या आईकडे देव बसवतात. सकाळ-संध्याकाळ पूजा आणि आरती. संध्याकाळच्या आरतीच्या वेळची घंटा आणि धुपाचा सुगंध मन एकदम प्रसन्न करून टाकतात.

घरी सवाष्णी घालतात त्या दिवशी चंदनाचा सुगंध येत असतो. चुलीवर मसाला दूध उकळत असते. एका बाजूस सर्व सवाष्णीना द्यायला घरचे विडे बनवले जात असतात. अश्या वेळेस मसाला दूध आधी घ्यावे की पान खावे हेच कळत नाही.

दसऱ्याच्या दिवशी पुरी-श्रीखंड हा बेत ठरलेला. श्रीखंडामध्ये भरपूर जायफळ घालायचे...नुसत्या वासानेच दुपारची वामकुक्षीची guarantee. दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणून सकाळी पुजायला ठेवतो तेव्हाचा त्यांचा वास आणि संध्याकाळच्या पानांचा वास वेगवेगळा असतो. संध्याकाळची पाने थकलेली, उदास वाटतात. पटकन कुस्करली जातात. कुस्करलेल्या पानांना पण वेगळा वास येतो.

दसरा संपतो आणि दिवाळीचे वेध लागतात. पावसाळा संपून हिवाळ्याकडे वाटचाल सुरु झालेली असते. पण म्हणून काही रविराजाला विसरता येत नाही. दिवसभर चांगलाच तापतो आणि तापवतो. पण संध्याकाळी गारवा पसरतो. दिवसा पानगळतीचा वास खूपच मस्त वाटतो.

आणि एक दिवस गल्ली-बोळातून जाताना बेसन भाजल्याचा घमघमाट येतो, आणि लक्षात येते की आली दिवाळी चार दिवसांवर. रस्त्या-रस्त्यांवर आकाशकंदील दिसायला लागतात. कुठे चकली, कुठे शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या, अनारसे, ह्या सगळ्या फराळामुळे दिवाळीची वाट आपण उत्सुकतेने बघायला लागतो. नवीन कपडे घेतले जातात. तुम्हाला आवडतो का नवीन कपड्यांचा वास? मला खूप आवडतो. दसरा - दिवाळी निमित्त घेतलेल्या नवीन कारच्या interior चा वास पण आवडतो.

आम्ही लहानपणी मौज म्हणून दिवाळीला "मोती चंदन" साबण आणायचो. दिवाळीच्या दिवशी पहाटे-पहाटे नवीन चंदन साबणाचा सुगंध, घराबाहेरून फटाक्यांचा वास, आणि सकाळचा थंडीचा वेगळाच सुगंध ह्याचे एक विलक्षण मिश्रण तयार व्हायचे.

भरपूर आनंद देऊन दिवाळी संपते आणि मग कडाक्याच्या थंडीचा मौसम सुरु होतो. भर थंडीत, अगदी दुपारीपण गोधडी घेऊन झोपावे, असे मस्त वातावरण होते. तेव्हा दुपारी उन्हात गेले की थंडीचा वास दरवळत असतो. याच दिवसांमध्ये दुपारच्या चारच्या वाफाळलेल्या चहाचे महत्व कळते.

जानेवारीमध्ये संक्रांत येते गुळपोळी घेऊनच. गरम-गरम गुळपोळी, त्यावर चमचाभर साजूक तूप, आणि चवीला बटाट्याची भाजी. ह्या combination ला तोडच नाही.

मग येतो वर्षातला शेवटचा सन, होळी! रंग, फुगे, पाणी, संध्याकाळची होळी, अन अर्थात पुरणपोळी. प्रत्येक सणाची काय वेगळी मजा असते ना! संध्याकाळच्या पेटलेल्या होळीने सर्वत्र गर्मी पसरते. येणाऱ्या वसंत ऋतूची चाहूल अलगद देऊन जाते.

वर्षभर वेगवेगळे सुगंध घेऊन आलेले ऋतुचक्र पुनश्च सुरु होते. गतवर्षीच्या विविध सुवासाची पुंजी घेऊन नवीन वर्षात आपणही जायला सज्ज होतो!

4 comments:

  1. Reminded me of the dreaded compositions we had to write in school. If only this was school. You'd have aced it! Your teacher wouldn't know what hit him/her! :D

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks so much dear! :) Thanks for reading through the lengthy post. ;)

      Delete
  2. आज सकाळी गरमागरम चहाचा कप आणि तुझ्या लेखातला 'दरवळणारा सुगंध' ,एकदम सगळेच बदलून गेले ग!
    मला सकाळी सकाळी ज्वलंत विषयांवर चर्चा किंवा तत्सम काहीही वाचायला आवडत नाही, काही हलके फुलके, चुरचुरीत पण दमदार...आणि मध्येच थोडे काही देऊन जाणारे दिवसभरासाठी...असे वाचायला आवडते.
    तुझ्या ह्या लेखाचे शीर्षक मला आवडले आणि सुरवातीचा 'चहा' जो मी आता घेत होते, मला लेख पुढे वाचायला उद्युक्त करू लागला...आणि काय खरच मस्तच वाटले!

    ReplyDelete
    Replies
    1. श्रिया, माझ्या लेखवरची तुझी कॉमेंट वाचून खूप आनंद झाला. माझ्या लेखामुळे कोणालातरी निखळ आनंद मिळाला, हीच गोष्ट माझ्या करता खूप मोठी आहे. धन्यवाद लेख वाचल्याबद्दल.

      Delete

Those Pesky Household Chores

Ten o' clock at night and I just finished sending the last email of the day. The dinner is done, and the kid is about to go to bed. &quo...