Tuesday, September 18, 2012

आठवणी लहानपणीच्या गणेशोत्सवाच्या

आज हरतालिका! आणि उद्या गणेश चतुर्थी. सकाळी उशीरच झाला उठायला. पूजा-अर्चा नाही झाली सकाळी. फक्त देवीला हळद-कुंकू वाहिले. दररोज सारखी office ला पण आले. कामामध्ये थोडा विरंगुळा, म्हणून office cafeteria मध्ये उभी होते, तेव्हा एकदम लहानपणीच्या गणपतीच्या आठवणी आल्या.

आम्ही लहान होतो तेव्हा आई हरतालिकेच्या दिवशी उठवून नाहायला लावायची. माळ्यावर कुठे तरी जपून ठेवलेली, जी फक्त तिलाच माहित असायची कशाची आहे ते, ती plastic ची पिशवी काढायला लावायची. उघडून बघावे आत तर काय! वाळू! मग आई आम्हाला त्या वाळूने पाटावर हरतालिका देवीच्या दोन बाहुल्या शेजारी-शेजारी, आणि त्यांच्या पुढ्यात महादेवाची पिंडी, असे तयार करायला लावायची. (उजवीकडे काढून दाखवले आहे.)

मग त्या पाटावर साग्रसंगीत पूजा व्हायची. हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले, पत्री, हे सगळे वाहायचे, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायचा. एखादे फळ असेल तर ते देखील ठेवायचे देवापुढे. त्या नंतरच खायला मिळायचे. भूक लागलेली असायची. पण "आजच्या दिवस तरी जरा दम धर" असे सकाळीच ऐकवलेले असायचे. मग गपचूप पूजा व्हायची वाट बघायची.

आम्ही खरी वाट बघायचो ते हरतालिकेच्या संध्याकाळची. आई ऑफिस मधून कधी येते त्याची आतुरतेने वाट  बघत असायचो. कारण संध्याकाळचे मुख्य आकर्षण असायचे...शनिवार वाड्यावर जाऊन गणपती बघायचे.

आमच्या घरी गणपती नसतो. म्हणून आई-बाबा आम्हाला घेऊन जायचे सगळे वेगवेगळे गणपती बघायला. काय मज्जा यायची! सर्व प्रकारचे गणपती असायचे...मोरावर बसलेला, हत्तीवर बसलेला, सिंहासनावर शिवाजी महाराजांसारखा, साई बाबांच्या वेषात, मुषकावर, वीणावादन करणारा, कृष्णासारखा डोक्याला मोराचे पीस असलेला, आणि किती तरी विविध रूपे.

खूप सारे काका-काकी आजू-बाजूला असायचे गणपती बाप्पाला घरी न्यायला आलेले असायचे. किती तरी मुले बाप्पांना घेऊन जात असायचे. एखादी हातगाडी दिसायची. त्यावर आठ-दहा छोटे-मोठे गणपती असायचे. सगळ्यांची तोंडं झाकलेली. एखाद्या चाळीतील सगळी मुले गोळा झालेली असायची, जोरजोरात ठरवा-ठरवी चालायची त्यांच्या मुलांच्या मंडळाचा गणपती कुठला ठरवायचा ते.


शनिवार वाड्याच्या त्या पटांगणावर पूर्ण फेरफटका मारायचो आम्ही. रात्री उशीरा पर्यंत. इतके सारे सुंदर गणपती बघून डोळे दिपायचे. मग आमच्या comments असायच्या...हा गणपती एकदम बेरकी दिसतोय, तो फारच cute आहे, हा छोटा फारच मिश्कील आहे. तो मोठावाला कॉमेडी दिसतोय. एकाचा डोळा जरा तिरका आहे, तर दुसऱ्याचे पोट जरा जास्तच बाहेर. काही गणपती "कृष्ण-धवल" असायचे, म्हणजे एक पूर्ण पांढरा, तर दुसरा एकदम कृष्ण सारखा काळा. काही ugly वाटायचे, तर काही जात्याचे सुंदर.

असे करत-करत कधी रात्रीचे दहा वाजायचे कळायचे नाही. मग दर वर्षी सारखे आम्ही विचारायचो: "एक छोटी मूर्ती न्यायची का?" मग नेहेमीचा संवाद व्हायचा.

"नाही न्यायची!"
"पण का??"
"आपल्याकडे गणपती नाही आणत."
"पण का म्हणून? सगळ्यांकडे असतो. आपल्याकडेच का नाही?"
"नाही."
"पण काय होता नेला तर? वाटल्यास पूजा नको करायला त्याची."
"अगं असे नाही चालत. मूर्ती आणली की पूजा-अर्चा सगळी करावी लागते."
"मग करूयात ना."
"आपल्यात नाही करत."

शेवटी मग compromise म्हणून दोन कमळं घ्यायचो. त्या कमळांचा काही उपयोग नसायचा, तरी घ्यायचो. आणि ते गणपतीमागे लावतात चक्र, ते देखील घ्यायचो.  just मज्जा म्हणून. त्यातच आनंद मानून घरी परतायचो.

मग दुसऱ्या दिवशी गणपती बसायचे. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचे, त्या सगळ्यांकडे संध्याकाळी जाऊन यायचे. गौरी-गणपती असतील, त्यांच्याकडे जाऊन यायचे. बिबवेवाडी, धनकवडी, मार्केट यार्ड, असे पुणे दर्शन करून घरी परतायचे.

विसर्जन ज्या दिवशी असेल, दीड दिवस, पाच दिवस, गौर-गणपती जातील तेव्हा, त्या सगळ्या दिवशी घाटावर जायचे. विसर्जनाची मज्जा बघायची, आणि मुख्य म्हणजे वाटली डाल, खिरापत, आणि पेढे, असे वेगवेगळ्या, अनोळखी लोकांच्याकडून पण प्रसाद मिळायचे. काय मौज वाटायची! आणि सगळे लोक अनोळखी लोकांना पण प्रसाद वाटतात. अतिशय उत्साही आणि मंगल वातावरण असायचे.

एव्हड्यात दहा दिवस कधी संपायचे कळायचे नाही. आदल्या-मधल्या दिवशी रात्री आई-बाबा गणपती दाखवून आणायचे. दगडूशेठ हलवाई, मंडई, तुळशीबाग, बाबू गेनू, जिलब्या मारुती, हिराबाग, खडकमाळ, जोगेश्वरी, कसबा गणपती, नातूबाग, गुरुजी तालीम, हत्ती गणपती, असे किती तरी. सगळे चालत-चालत बघायचे. कधी कधी थोडा पाऊस असायचा. पण तरी सगळे गणपती cover करायचे. कणीस खायचे आणि चालत-चालत फिरायचे. खूप धम्माल केली.

अनंत चातुदशी च्या दिवशी आमच्या काकांकडे अनंताची पूजा असते. मग आम्ही त्या दिवशी सकाळी अकरा पर्यंत जायचो त्यांच्याकडे. आई प्रसादाला कायम बोटव्याची खीर करून न्यायची. येत-जाता किती तरी मिरवणुका दिसायच्या.

रात्री लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक बघायला जायचो. शेवटचा दगडूशेठ हलवाईचा गणपती गेला, की एकदम खाली-खाली वाटायचे. आता गणपतीची भेट एकदम पुढल्या वर्षीच, असे मनात म्हणत घरी परतायचे.

आज इतक्या वर्षांनी सगळ्या गोष्टी जश्याच्या तश्या डोळ्यां पुढे उभ्या राहिल्या. खूप nostalgic वाटले. आठवणी पण साठवून ठेवाव्यात, असे वाटून गेले, म्हणून पटकन लिहून काढले. या पुढे पण गणपती उत्सव होईलच, ढंग नक्कीच वेगळा असेल!

4 comments:

  1. एक जपानीSeptember 18, 2012 at 3:42 PM

    || बोला गणपती बाप्पा मोरया ||

    ReplyDelete
  2. फारच छान लिहिले आहेस...बालपणीच्या आठवणी ह्या नेहमीच आपल्याला एकदम ताजेतवाने करतात! त्यात सण,एकत्र साजरे केलेले,खास आनंद देतात.
    तुला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. लहानपणी केलेली मजा ही मोठेपणी त्या सगळ्या आठवणीमुळे जास्त "एन्जॉयबल" होते.

      तुला आणि तुझ्या घरच्याना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

      Delete
  3. poorna vaachun kaadaaylaa jaraa vell laagle... pan khup chaan vaatala... ek sepia tone madhe - chitrapataasaarakhe :))
    sundar ahe dear! :))

    love,
    reva :)

    ReplyDelete

Those Pesky Household Chores

Ten o' clock at night and I just finished sending the last email of the day. The dinner is done, and the kid is about to go to bed. ...