Sunday, October 27, 2013

मांजर

गेल्या  आठवड्यात, मी आणि संजीव जेवायला गेलो रात्री बाहेर. तसा उशीर झाला होता. गप्पा आणि जेवण होई पर्यंत रात्रीचे अकरा वाजले. हॉटेल मधून बाहेर पडलो तेव्हा नेहेमी सारखे valet पार्किंग करता दिलेली गाडीची किल्ली मिळाली आणि आम्ही गाडीच्या दिशेने चालायला लागलो.

जेवण छानच झाले होते, त्यात गप्पा पण भरपूर झाल्या होत्या. एकंदरीत तृप्त वातावरणात घरी जायच्या विचारात आम्ही होतो.

तितक्यात छोट्या मांजरीच्या पिल्लाचा आवाज आला. मी आजूबाजूला बघून आवाज कोठून येत आहे ह्याचा शोध घ्यायला सुरु केला, पण काही केल्या मांजर दिसेना. संजीवने गाडी पार्किंग मधून काढण्यास सुरु केली, आणि अचानक मला ते पिल्लू आमच्याच गाडीच्या खालून ओरडत आहे असे लक्षात आले.

मी संजीवला सांगितले गाडी हळूच मागे घ्यायला जेणे करून ते पिल्लू आपोआप मागे राहील आणि गाडीच्या खालून बाहेर पडेल. पण पिल्लू इरसाल निघालं. जशी गाडी मागे जात होती, तसं ते अजून पुढे-पुढे जात होत. पिल्लाला काही गाडीच्या खालून बाहेर पडायचं नव्हतं.

आता आली का पंचाईत! आमची गाडी रस्त्याच्या मधोमध तिरकी, त्यात चालक बसलेला. गाडी सुरु होती, पण गाडी ना पुढे नेता येत, ना मागे.

पार्किंग attendant च्या लक्षात आले काही तरी गडबड आहे, म्हणून तो आला विचारायला. त्याला सांगितले की गाडी खाली मांजर आहे. तो प्रयत्न करू लागला पिल्लाला हुस्कावायला. पण पिल्लू हुशार निघालं. एक माणूस आपल्याला आपल्या लपायच्या जागेतून बाहेर काढत आहे ते त्याला समजलं. त्याने अजून एक युक्ती केली. पुढच्या चाकावर जाऊन बसलं. attendant  अजूनही "छुत छुत" करून पिल्लाला हाकलायचा प्रयत्न करत होता.

मांजर आता चाकावर बसल्याने गाडीला हलवणे अशक्य झाले होते. गाडी रस्त्यात तिरकी बंद पडलेली दिसते, काही मदत लागत आहे का बघावी ह्या उद्देशाने एका बाईक वरून दोघे जण गाडीजवळ आले.

"गाडी बंद पडली आहे का? काही मदत करू का?" अशी विचारपूस केली.

"अहो, बंद नाही पडलेली. चाकावर मांजर शिरून बसलंय. हालातच नाहीये"

"काय?! चाकावर मांजर कसं काय चढलं?"

"गाडीखाली लपलं होतं. बाहेर काढत होतो आम्ही, तर चाकावर चढून बसलं."

हा संवाद चालू असताना पिल्लाने अजून एक पराक्रम केला. चाकावरून चक्क आत bonnet मधेच शिरलं. गाडीचं  इंजिन चालू होतंच, मस्त गरम-गरम ऊबदार ठिकाणी बसायची जागा पटकावली. आता मात्र हद्द झाली! आता पिल्लाला बाहेर काढायचं कसं?

एका बाजूला हा गोंधळ सुरु होता तर नेमकं त्याच वेळेस संजीवच्या ऑफिस मधली एक मैत्रीण तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर त्याच हॉटेलच्या बाहेर उभी असलेली संजीवने बघितली. तिचे पण लक्ष गेले तर ती आली आमच्याशी बोलायला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून देऊ लागली.

माझे तर काही लक्षच नव्हते तिच्या बोलण्याकडे. ओळख करून दिली तिने तसं "hi" वगैरे बोलून झालं. पण चिंता होती की ते पिल्लू बाहेर काढायचं कसं. ज्या वेळेस ओळख करून देणं  चालू होतं, त्या वेळेस आमच्या गाडीच्या bonnet  मध्ये चार अनोळखी लोकांची डोकी खुपसून मांजरीला शोधणे सुरु होते.

आता ह्या चार डोक्यांमध्ये आतून आलेला वेटर पण शामिल झाला. एका माणसाने त्याच्या मोबाईलचा flash light चालू केला.

"अरे, ती बघा तिथे आहे, दिसली का?"

"कुठे?"

"तिथे खोपच्यात बसली आहे."

"हां, हां, दिसली. हात जातोय का बघ ना."

"इंजिन गरम आहे. आणि जागा नाहीये हात घालायला."

तेव्हड्यात कोणीतरी खराट्याच्या दोन काड्या आणल्या. bonnet मध्ये घालून, मांजरीला हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. पण काही केल्या पिल्लू बाहेर येईना. अखंड "म्याव म्याव" चालूच होतं.

सगळा गोंधळ बघून मैत्रिणीचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा प्रश्न, "गाडी बंद पडली आहे का? मेकानिक ला बोलवायचा का? अर्ध्या तासात येईल मदत."

"अहो, गाडी ठीक आहे. गाडीला काही नाही झालेलं. bonnet मध्ये मांजर शिरली आहे."

"मांजर कशी काय शिरली? रिट्झ गाडी मध्ये शिरते माहित होतं, पण तुमच्या असल्या गाडीत पण शिरेल वाटलं  नव्हतं."

"आता माहित झालं ना!" मी माझ्या मनात म्हटलं.

तेवढ्यात कोणाच्या डोक्यात कल्पना सुचली माहित नाही, पण कोणी तरी पाण्याची बादली घेऊन आलं. मोबाईलच्या flash light च्या अंधुक प्रकाशात नेमकी मांजर कुठे बसली आहे ह्याचा अंदाज घेऊन पाणी ओतलं गेलं. तसं त्या पिल्लाने बचावात्मक पवित्रा घेऊन bonnet मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण पूर्णपणे बाहेर न येता, पुन्हा एकदा चाकावर बसण्यास पसंती दिली.

"निघाली, निघाली! गाडी खाली दिसत आहे का?"

"नाही खाली नाही आली अजुन."

"मग आवाज कुठून येत आहे?"

"अरे ही बघा, परत चाकावर बसली आहे."

"अरे घाल बिनधास्त हात. पिल्लाला काय घाबरतोस! चाकावर आहे तर पकडून काढ बाहेर!" असा सल्ला देणाऱ्या गृहस्थाच्या मित्राने शेवटी हिम्मत करून, चाकावर नखाने घट्ट पकडून बसलेल्या, बिथरलेल्या, बिचाऱ्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढले आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला!

वीस मिनिटे चाललेल्या नाटकाचा अंत शेवटी आम्ही सगळ्या अनोळखी लोकांच्या आभार प्रदर्शनाने केला. म्हणजे प्रसंग असा होता की गाडी आमची, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. बाकीच्याच सर्व लोकांनी अथक प्रयत्न करून पिल्लाला तर वाचवलेच, पण आमची पण सुटका केली.

मांजर हे कुठे कुठे शिरू शकतं हे त्या दिवशी मला उमगले.