हे भक्तीगीत ऐकले की मी एकदम वेगळ्याच जगात जाते. जुने दिवस आठवतात. घरातले त्या वेळेला घडलेल्या घटना जशाच्या तशा डोळ्यांपुढे राहतात. खरं तर त्या घटना काही एकदम वेगळ्या अशा नाहीत. पण कसे कोण जाणे, पण ह्या गाण्याचे आणि त्या गोष्टींचे एक association झाले आहे माझ्या मनात.
कालंच ऑफिस मधून परतत असताना हे गाणं कारमध्ये ऐकलं. डोळ्यांसमोर पहिली गोष्ट उभी राहिली ती म्हणजे पाठमोरी आई ओट्याजवळ, चपात्या करताना. वेळ आहे सकाळी पावणे आठची.
कालंच ऑफिस मधून परतत असताना हे गाणं कारमध्ये ऐकलं. डोळ्यांसमोर पहिली गोष्ट उभी राहिली ती म्हणजे पाठमोरी आई ओट्याजवळ, चपात्या करताना. वेळ आहे सकाळी पावणे आठची.
आणि मग पूर्ण दृश्य उभे रहिले. शाळेचे आणि कॉलेजचे दिवस आठवले. आई सकाळी उठून आमचा डबा बनवायची. त्या वेळेस आमच्याकडे चपात्या करायला बाई नव्हती. आईच करायची. तिच्या चपात्यापण किती मस्त व्हायच्या. एकदम खुसखुशीत, माऊ, आणि ताज्या. तव्यावरची एक गरम-गरम चपाती घ्यावी, आणि नुसती खावी. काय स्वाद असायचा! मला 'समाधी साधन' हे बाबूजींचे गाणे ऐकले की तो चपात्यांचा घमघमाट पण येतो.
आम्ही कायम उशीरा उठायचो शिकत होतो तेव्हा. आई दररोज ओरडायची. चपात्या करत असताना स्वयंपाक घरातून आवाज द्यायची. सकाळी सात पासून. आम्ही कसे-बसे आठ-सव्वा आठला उठायचो. तो पर्यंत आईची भाजी टाकून झालेली असायची आणि चपात्या सुरु झालेल्या असायच्या.
बरोब्बर त्याच वेळेस सकाळी रेडिओवर भक्तीसंगीत लागायचे. अजूनही लागते म्हणा. बरोब्बर त्या वेळेस उठणं व्हायचं. बाबा काम करत असायचे, सकाळच्या आवरा-आवरीचे. आणि आम्ही निवांत कशा-बशा उठणार. "किती हाका मारतेस!" असे म्हणतच उठायचो.
मग आमची हळू-हळू गाडी सरकणार पुढे आवरायला. आरामात तयार होवून, मग शाळा अथवा कॉलेजला स्वारी निघणार. तो पर्यंत आई-बाबा, दोघांचे आवरायचे, आणि ते पण त्यांच्या कामांना बाहेर पडायचे.
सगळ्यांचाच नवा दिवस सुरु व्हायचा, भक्ती संगीताने आणि खमंग चपात्यामुळे!




